पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (cropsap )

 

                सोयाबीन, कापूस, तूर,हरभरा, भात,मका, ज्वारी व ऊस  या महत्वांच्या प्रमुख पिकांवर वारंवार तसेच आकस्मिकरीत्या उद्भवणाऱ्या कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणारे शेतकऱयांचे नुकसान व त्यामुळे उत्पादनात होणारी घट लक्षात घेता यासाठी किडरोग सर्वेक्षण , सल्ला, जन जागृती व व्यवस्थापन याबाबतची शाश्वत यंत्रणा तयार करण्याच्या दृष्टीने पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (cropsap )” राबविण्यात येत आहे.
 
प्रकल्पाचा उद्देश- 

    १. शेतकरी यांचेमध्ये कीड व रोगांची ओळख निर्माण करणे, त्यांना  कीड रोगांचे वेळीच व्यवस्थापन करणे.

    २. कीड रोगांच्या प्रादुर्भावाबाबत जागरूकता निर्माण करणे  व पुढील संभाव्य नुकसान टाळून उत्पादनात 

        वाढ करणे.

   ३. पिकांचे सर्वेक्षण करून हंगाम निहाय प्रमुख कीड रोगांच्या प्रादुर्भावाबाबत शेतकरी यांचेमध्ये जाणीव निर्माण करणे व त्यांना  वेळीच उपाययोजना सुचविणे.

     ४. कीड रोग प्रादुर्भावित क्षेत्रासाठी आपत्कालीन परिस्थितीत पीक संरक्षण औषधे उपलब्ध करून देणे. 

 सर्वेक्षण कार्यपद्धती-

                  दर सोमवार ते शनिवार कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक निश्चित प्लॉट मधील कीड रोगांच्या विविध अवस्थाची फेरोमोन सापळे व इतर साधनांच्या मदतीने प्रत्यक्ष निरीक्षणे घेतात. या निरीक्षणांचे संस्करण राष्ट्रीय सुचना विज्ञान  केंद्र पुणे यांचेकडून करण्यात येते. सदर संस्करित तपशिलाचे कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ विश्लेषण करतात आणि दर सोमवारी व गुरुवारी ऑनलाईन संकेतस्थळावर तालुका निहाय उपाय योजना सुचवितात. या उपाय योजनांच्या आधारे शेतकरी यांना दूरदर्शन, आकाशवाणी, एसएमएस, वृत्तपत्रे इ. प्रसिद्धी माध्यमांद्वारे मार्गदर्शन करण्यात येते. व त्यानुसार शेतकरी वेळीच कीड रोग नियंत्रणाच्या उपाययोजना करतात. कृषी विद्यापीठाकडून ऑनलाईन प्राप्त होणारे तालुकानिहाय पीक संरक्षण सल्ले (advisory )उपविभागीय कृषी अधिकारी हे एमकीसान पोर्टल द्वारे कार्यक्षेत्रातील शेतकरी यांना एसएमएस दवारे पाठवतात

                 कृषी सहाय्यक हे त्यांच्या मुखालाया अंतर्गत सोयाबीन, कापूस, तूर,हरभरा, भात,मका, ज्वारी व ऊस   पिकांचे जास्तीत जास्त क्षेत्र असणारी दोन गावे निवडून तेथील सदर दोन प्रमुख पिकांचे सर्वेक्षण करतात. सर्वेक्षणासाठी पिकाचे निवडलेले क्षेत्र शक्यतो १ एकर असावे. कीड रोगाच्या अचूक सरासरीकरिता निवड केलेल्या गावात संबंधित पिकासाठी किमान दोन प्लॉट मधील सर्वेक्षण करणे अनिवार्य आहे. सर्वेक्षणासाठी आठवड्याचे दोन गट करण्यात येतात. पहिला गट सोमवार ते बुधवार व दुसरा गट गुरुवार ते शनिवार. प्रत्येक गटात एक गाव याप्रमाणे दोन गावांचे प्रत्येक आठवड्यात सर्वेक्षण करण्यात येते. म्हणजेच प्रत्येक गटात एक गाव-त्या गावातील एक प्रमुख  पीक- त्या प्रमुख पिकाचे २ प्लॉट याप्रमाणे एका आठवड्यात दोन गावे -त्या दोन गावातील प्रत्येकी एक प्रमुख पीक - एका गावातील प्रमुख पिकाचे दोन प्लॉट याप्रमाणे आठवड्यात ४ प्लॉट चे सर्वेक्षण करण्यात येते.

                 मात्र वरील दोन गावांमधील प्रमुख पिकांव्यतिरिक्त मका,ज्वारी किंवा ऊस पिकाचे क्षेत्र असल्यास या तिन्ही पिकांपैकी सर्वात जास्त क्षेत्र असलेल्या एका पिकासाठी अधिकचे दोन प्लॉट चे सर्वेक्षण करावे. म्हणजेच एका आठवड्यात दोन गावे- तीन पिके - ६ प्लॉट याप्रमाणे सर्वेक्षण करण्यात यावे. कृषी सहाय्यकाकडे एकाच गाव असल्यास व तेथे मका ज्वारी किंवा ऊस असल्यास सदर त्याच गावातील दोन किंवा तीन पिकांसाठी दोन प्लॉट प्रति पीक याप्रमाणे दर आठवड्यास एकूण ६ निश्चित प्लॉट वरील सर्वेक्षण करणे अनिवार्य आहे.

                  कृषी पर्यवेक्षक हे कृषी सहाय्यकांनी निवडलेल्या गावांच्या व्यतिरिक्त इतर गावातील अन्य दोन पिकांचे सर्वेक्षण करतात.

               पिकांसाठी क्रॉपसॅप संलग्न शेती शाळा राबवायच्या आहेत. या शेतीशाळेसाठी गाव व प्लॉट निवडायचे आहेत. त्यादृष्टीने सदर गावे संबंधित कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षकाद्वारे सर्वेक्षणाकरिता निवड करणे बंधनकारक आहे.  

     कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक हे निश्चित प्लॉट मधील सर्वेक्षण करतात. म्हणजे गावातील एका प्रमुख पिकाचे जे दोन प्लॉट निवडण्यात येतात त्याच प्लॉट वर दर आठवड्याला एकदा याप्रमाणे पूर्ण हंगाम निरीक्षणे घेण्यात येतात. एकदा निवडलेला प्लॉट बदलत नाहीत. एका गावातील प्रमुख पिकाचे दोन प्लॉट निवडताना एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असलेल्या निश्चित प्लॉटची निवड करावी. सदर प्लॉट ची निवड पूर्णतः रँडम पद्धतीने करावी. 

 तसेच ज्या ठिकाणी कीड रोगांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या जवळ तसेच त्यावर गेलेला असेल अशा ठिकाणी वरिष्ठ अधिकारी भेट देतात व कीड रोग नियंत्रणाबाबत कार्यवाही करतात. 

             मंडळ कृषी अधिकारी यांनीही कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांनी निवडलेली गावे वगळून इतर दोन गावात प्रत्येकी दोन रँडम प्लॉट याप्रमाणे आठवड्यात ४ प्लॉटचे सर्वेक्षण करायचे आहे. मंडळ कार्यक्षेत्रातील सर्व गावे व पिकांचा सर्वेक्षणासाठी अंतर्भाव होण्याच्या दृष्टीने रँडम सर्वेक्षणासाठी दर वेळी नवीन गावाची निवड करावी. कार्यक्षेत्रातील सर्व गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर चक्राकार पद्धतीने पुन्हा पहिल्या गावापासून सर्वेक्षणाची सुरुवात करावी. तसेच ज्या ठिकाणी कीड रोगांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या जवळ किंवा त्यावर गेलेला आहे त्या ठिकाणी भेट देऊन पर्यवेक्षण करावे. व त्या ठिकाणी रँडम सर्वेक्षण करून कीड नियंत्रणाकरिता केलेल्या उपाय योजनांचा तपशील मोबाईल ऍप द्वारे नोंदवावा. 

             तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी ज्या ठिकाणी कीड रोगांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या जवळ किंवा त्यावर गेलेला आहे त्या ठिकाणी भेट देऊन पर्यवेक्षण करावे. व त्या ठिकाणी रँडम सर्वेक्षण करून कीड नियंत्रणाकरिता केलेल्या उपाय योजनांचा तपशील मोबाईल ऍप द्वारे नोंदवावा. प्रत्येक आठवड्यात कीड रोगांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या जवळ किंवा त्यावर गेलेल्या किमान दोन गावांना भेटी देऊन पर्यवेक्षण व मोबाईल ऍप द्वारे सर्वेक्षण करून  उपाययोजना कराव्यात. 

 कृषी सहायक , कृषी पर्यवेक्षक , मंडळ कृषी अधिकारी यांनी त्यांना सर्वेक्षणाच्या असलेल्या लक्षांकाव्यतिरिक्त शेतकरी, लोकप्रतिनिधी तसेच प्रसार माध्यमातील माहितीनुसार अचानक कीड रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या अन्य ठिकाणी रँडम सर्वेक्षण करून त्याची निरीक्षणे मोबाईल ऍप द्वारे नोंदवावीत. 

 पीकनिहाय सर्वेक्षण करण्यात येणारे  कीड रोग-

         सोयाबीन- तंबाखू वरील पाने खाणारी अळी (spodoptera litura ), हेलिकोव्हर्पा, उंट अळी , चक्री भुंगा व खोड माशी. 

        कापूस-  तंबाखू वरील पाने खाणारी अळी, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, गुलाबी बोंड अळी , अमेरिकन (हिरवी )बोंड अळी, ठिपक्यांची बोंड अळी. 

           तूर- शेंगा पोखरणारी अळी , शेंग माशी, पाने व फुलांची जाळी करणारी अळी. 

           हरभरा- घाटे अळी  व मर रोग 

         भात- खोड किडा, गादमाशी , लष्करी अळी , तुडतुडे, निळे भुंगेरे , हिस्पा, पानावरील करपा, पर्णकोश करपा व जिवाणूजन्य करपा. 

            मका व ज्वारी- मक्यावरील नवीन लष्करी अळी  

            ऊस- हुमणी व मक्यावरील नवीन लष्करी अळी

  

सर्वेक्षणासाठी पीकनिहाय कालावधी-

              १. सोयाबीन / खरीप मका / खरीप ज्वारी - 1 जुलै ते 30 सप्टेंबर 

             २. कापूस- 1 जुलै ते 27 डिसेंबर 

             ३ .तूर/ रबी मका / रबी ज्वारी - 1 ऑक्टोंबर ते 27 डिसेंबर 

             ४. हरभरा- 17 नोव्हेंबर ते 14 फेब्रुवारी 

          
                         ५.  भात / ऊस - 1 जुलै ते 15 नोव्हेंबर 


 मार्गदर्शक सुचना-

     पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प

 क्रॉपसॅप संलग्न शेतीशाळा-

             पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प संलग्न शेतीशाळा

          पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प - मोबाइल ऐप वर निरीक्षणे नोंदवणे

राबविण्यात येणारे घटक-

         १. कृषी विद्यापीठाकडून ऑनलाईन प्राप्त होणारे तालुकानिहाय पीक संरक्षण सल्ले (advisory ) जम्बो झेरॉक्स करून गावात लावणे- पीक संरक्षण सल्ले (advisory ) हे प्रत्येक गावातील कृषी वार्ता फलकावर तसेच कृषी सेवा केंद्रावर लावणे अपेक्षित आहे. तसेच कीड रोगाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या जवळ पोहोचताच मराठी भाषेतील पीक संरक्षण सल्ले (advisory ) ची जम्बो झेरॉक्स प्रत करून तालुक्यातील प्रत्येक गावात लावावी. यासाठी प्रति मंडळ रु. २५०० इतकी तरतूद आहे. 

        २. विविध माध्यमांद्वारे प्रचार प्रसिद्धी - कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी तसेच सोयाबीन भात तूर हरभरा पिकांवरील कीड रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने विविध छापील व इलेक्ट्रॉनिक प्रचार व प्रसिद्धी माध्यमांद्वारे शेतकरी यांचेमध्ये जन  जागृती करणे यासाठी प्रति विभाग रु. १ लाख इतकी तरतूद आहे. 

          

       ३. शेतकरी शेतीशाळा - खरीप व रब्बी हंगामात उपरोक्त पिकांच्या पीकनिहाय शेतीशाळा आयोजित करण्यात याव्यात. प्रती शेतिशाळा रु.14000 इतकी तरतूद आहे.

      शेतिशाळा बाबीसाठी खर्चाचे मापदंड-

   1. प्रशिक्षण साहित्य व इतर तांत्रिक साहित्य (प्रती शेतकरी रु.200x 25 शेतकरी)-  रु. 5000/-

   2. अल्पोपहार ( रु.20 प्रती शेतकरी x 25 शेतकरी x 10 वर्ग) - रु. 5000/-

  3. शेती दिन खर्च- रु. 2000/-

 4. विश्लेषणात्मक अहवाल तयार करणे- रु.2000/-

याप्रमाणे एकुण तरतूद रु.14000/- इतकी आहे.

    ४. ऑनलाइन पेस्ट मॉनिटरिंग अँड अडव्हायझरी सर्व्हिसेस (opmas )अंतर्गत गुलाबी बोंड अळी  व इतर कीड रोग व्यवस्थापन - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान -व्यापारी पिके अंतर्गत -बीटी विरहित -सधन कापूस विकास कार्यक्रम राबविण्यात येतो. सदर कार्यक्रमातील ऑनलाइन पेस्ट मॉनिटरिंग अँड अडव्हायझरी सर्व्हिसेस हा घटक क्रॉप सॅप कार्यक्रमाशी संलग्न करून राबविण्यात यावा. सदर कार्यक्रम राबविण्यात येत असलेल्या गावातील पिकाचा क्रॉप सॅप प्रकल्पाअंतर्गत रँडम किंवा निश्चित सर्वेक्षणासाठी अंतर्भाव करता येईल. कापूस पिकाच्या सर्वेक्षणाचा खर्च प्राथम्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान -व्यापारी पिके अंतर्गत  कापूस पिकाखालील सर्वेक्षणाच्या तरतुदीतून करावा. 

   ५. आपत्कालीन परिस्थितीत पिकांवरील कीड रोगांचे व्यवस्थापन करणे किडींचा प्रादुर्भाव वाढल्यास आर्थिक नुकसान पातळीच्या वरील गावात तात्काळ उपाययोजना करुणेच्या दृष्टीने विविध योजना, अन्न सुरक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनाकरिता उपलब्ध तरतुदीतून तसेच क्रॉपसॅप योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार (प्रती हे.50 टक्के किवां कमाल रु.750/-) शेतकऱ्यांना रासायनिक कीटकनाशके या आपत्कालीन निविष्ठांसाठी अनुदान देण्यात येते. 

 

 

 

 

 


 

1 comment: